-: उत्सव फं:-

सुमारे ४० वर्षांपर्यंत हा उत्सव ग्रामस्थ मंडळी आपसात पट्टी (वर्गणी) जमवून करीत असत. पण पुढे पट्टी वेळेवर वसूल होण्यास अडचण पडू लागल्यामुळे, उत्सव अगदीच निकृष्टावस्थेत आला. ही उद्वेगजनक परिस्थिती पाहून ग्रामास्थांपैकी कै. गोपीनाथ जनार्दन आठल्ये व कै. कृष्णाजी वासुदेव आठल्ये या उभयतांनी या उत्सवाची काहीतरी कायमची व्यवस्था लावावी या हेतूने श्रींच्या उत्सवास मिती कार्तिक शु. १५ शके १८१५ (इ. स. १८९३) रोजी सर्व ग्रामस्थ मंडळीस जमवून, फंड जमवून त्याच्या व्याजातून उत्सव करण्याविषयी सूचना केली. त्यावर विचारविनिमय होऊन फंडाची आवश्यकता सर्वांस पटून त्याची व्यवस्था लावण्यासाठी सभा घेण्याचे ठरले व मिती कार्तिक व २ शके १८१५ (इ. स. १८९३) शनिवारी श्रींच्या देवळात सभा होऊन द्रव्यनिधी सर्वानुमते जमवणे, त्याची व्यवस्था ठेवणे व त्याच्या व्याजातून श्रींचा उत्सव करणे इत्यादी कामासाठी ११ जणांचे एक व्यवस्थापक मंडळ नेमण्यात आले. या मंडळाकडून कामास सुरुवात होते तोच अनेक अपरिहार्य अडचणी येऊन फंडाच्या कामास धक्का बसला व काम थांबले.

याच आठल्ये इनामदार यांनी आपले समाईक इनामातीवरील पट्ट्यांचे सुमारे ५ रुपयांचे उत्पन्न श्रींच्या उत्सवाकडे दरसाल खर्चाकरिता दिले व तेव्हापासून ते दरसाल उत्सवाकडे येत असे.

 

 

-: देवालयाचा जीर्णोद्धा :-

या सुमारास श्रींचे देवालय अगदी जीर्ण झालेले होते; व ते पडण्याच्या बेतात असल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आपसात वर्गणीने ते चांगले बांधण्याचे ठरवले व शके १८१८ (इ. स. १८९६) साली कामास सुरुवात केली. कै. रामकृष्ण मोरेश्वर केतकर, रा. कोंडगाव यांजकडे त्यासाठी मदत मागण्यात आली. त्यांनी या देवालायाशी आपला पूर्वसंबंध लक्षात आणून, उदार मनाने रुपये २६८ रोख (झालेल्या खर्चाचा १/८) देणगी म्हणून दिली. देवालय बांधण्यास सर्व आठल्ये इनामदार यांनी हरएक प्रकारची मदत करून काम तडीस लावले. त्यामुळे श्रींचा प्रासाद फारच प्रेक्षणीय झाला होता.

द्रव्यानिधीच्या कामास सुरुवात :

याप्रमाणे देवालयाचे काम पूर्ण होऊन निधीचे काम हाती घेण्यास सुरुवात होणार तोच पुन्हा नवीन संकटे व अडचणी उत्पन्न होऊन ते काम पुन्हा मागे पडले. या दरम्यानच्या काळात श्रींचा उत्सव कसाबसा सुरु झाला होता. परंतु श्रीकृपेने त्या कामास जोराने सुरुवात होण्याचा पुन्हा योग आला.

शके १८२३ (इ.स. १९०१) सालापर्यंत फंडाकडे खर्चवेच वजा जाता अवघे ७ रुपये शिल्लक होते. शके १८२३ मध्ये (ता. २२ माहे एप्रिल सन १९०१ रोजी) श्रींच्या देवालयात सर्व ग्रामस्थ ब्राह्मण मंडळीस निमंत्रण केल्याप्रमाणे मंडळी जमल्यावर निधी जमविण्याचे काम ताबडतोब सुरु करण्याबद्दल ठराव झाला; तो जमविण्यासाठी पाच इसमांची निवड करण्यात आली व त्यांच्या व्यवस्थेसाठी खालीलप्रमाणे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले.

अध्यक्ष – कै. वे. शा. सं. श्रीकृष्ण रामकृष्णशास्त्री  आठल्ये

उपाध्यक्ष – कै. हरी आबाजी आठल्ये

सेक्रेटरी – कै. गणेश गोपाळ आठल्ये  कै. विष्णू वासुदेव आठल्ये.

खजिनदार – कै. मधुसूदन वासुदेव आठल्ये.

सभासद – (ग्रामास्थांपैकी) असामी सात.

याच सभेत कै. मधुसूदन वासुदेव आठल्ये यांनी निधी ताबडतोब जमावा यासाठी ग्रामस्थांनी एका वर्षात निदान २०० रुपये जमा केल्यास, आपण स्वतः दोनशे रुपये देऊ असे सांगितल्यामुळे त्याप्रमाणे रक्कम पहिल्या वर्षात जमविण्यात आली. त्यांनीही कबुल केल्याप्रमाणे निधीकडे दोनशे रुपये लागलीच जमा केले. त्याचप्रमाणे या देवस्थानचे मूळ संस्थापक यांचे वंशज कै. रामकृष्ण मोरेश्वर केतकर यांनीही फंडास १०० रुपये दिले. याप्रमाणे रकमा जमताच त्याच्या व्याजातून ग्रामस्थांकडील वर्गणीतून उत्सव खर्च जेमतेम भागू लागला.

-: द्रव्यनिधीची व्यवस्था :-

अशा रीतीने फंड जमू लागल्यावर त्याची योग्य ती व्यवस्था लावण्यासाठी ता. २३-३-१९०३ रोजी सर्व ब्राह्मण ग्रामस्थांना यादी लिहून निमंत्रण करून सभा भरविण्यात आली व तीत नियम करण्यात आले. अध्यक्ष वगैरेंच्या नेमणुका कायम करण्यात येऊन उत्सवाचे सर्व काम तडीस लावण्यासाठी कार्यकारी मंडळातील सभासदांऐवजी पाच वर्षांपुरते पाच व्यक्ती व्यवस्थापक मंडळाचे सभासद म्हणून निवडण्याचे ठरून, त्याचप्रमाणे निवडणूकही करण्यात आली. उत्सवाची सर्व कृत्ये व वेळा ठरविण्यात येऊन खर्चाचे अंदाजपत्रकही करण्यात आले. याप्रमाणे सर्व व्यवस्था झाल्यावर उत्सवाचे काम जोराने व व्यवस्थित सुरु झाले व ते आजपर्यंत सुरु आहे. उत्सवासाठी व्यवस्थापक कमिटीची निवड दर पाच वर्षांनी होत असून, निवडले गेलेले सभासद मोठ्या आस्थेने व कळकळीने उत्सवाचे सर्व काम करीत असतात.

या देवस्थानचे अहवाल इ.स. १९१७, १९३१, १९५०, १९६०, १९७२, १९७५, १९८१, १९९०, २००० व २०१० मध्ये प्रसिद्ध झाले व त्यात त्यावेळेपर्यंतची देणगीदारांची नावे दिलेली आहेत.

-: संस्थेच्या इमारती :-

श्रींच्या प्रासादाभोवतीची चारही अंगणे मोकळी होती. त्यामुळे ती विशोभित दिसत असत व गुराढोरांकडून वगैरे त्रासही होत असे. ही अडचण दूर करण्यासाठी कै. मधुसूदन वासुदेव तथा भाऊसाहेब आठल्ये यांनी सुमारे ६०० रुपये खर्च करून शके १८२८ च्या चैत्रमासी (इ.स. १९०६) दहा मैलांवरून जांभे दगड आणवून सुंदर पोवळी बांधली आहे.

 

-: धर्मशाळा :-

देवालयाच्या दक्षिणेस कै. अंताजीपंत हळबे यांनी एक लहानशी धर्मशाळा बांधली होती. परंतु ती पडल्यामुळे पुन्हा कै. गोपाळ नारायण आठल्ये यांनी सुमारे ८० रुपये खर्च करून दुरुस्त केली होती, परंतु तीही अगदी नादुरुस्त झाल्यामुळे चांगला मजबूत पाया घालून धर्मशाळेची नवीन इमारत बांधण्यात आली. या कामासाठी खालील इसमांनी मदत केली ती येणेप्रमाणे –

२५ रु. कै. गुंडो केरो कयाळ यांच्या स्मरणार्थ हस्ते कै. श्री. गुं. कयाळ.

१५ रु. कै. श्रीराम गुंडो कयाळ

२० रु. कै. गणेश जगन्नाथ सप्रे.

सदरहूशिवाय ग्रामस्थांकडूनही या बाबतीत थोडीबहुत मदत झाली आहे. त्यानंतर या धर्माशालेचाही पुन्हा जीर्णोद्धार करणे आवश्यक झाले. सबब इ.स. १९७२ साली पूर्वीच्याच जागी नवीन धर्मशाळा सुमारे २० हजार रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. वाळवीमुळे सदर धर्मशाळेतील माळा, लाकडी स्टँड खराब झाल्यामुळे २००७ साली रु. ७५,०००/- खर्च करून ऑफिसमध्ये लादी, भटारखान्यात फरशी, सिमेंट पत्र्याचा माळा व कडप्पा स्टँड इ. परत दुरुस्ती करण्यात आली.

-:दीपमाळा :-

कै. धोंडो बापूजी कारखानीस खोत, मौजे कोचरी यांनी एक दीपमाळा स्वतःच्या खर्चाने (रुपये १२५) बांधून श्रींस अर्पण केली. त्यानंतर ती भरणे आरल्यामुळे पुन्हा दुरुस्त करण्यात आली. त्या कामास रुपये ५० पर्यंत खर्च करण्यात आला. त्याचप्रमाणे दुसरी दीपमाळा कै. गोपाळ नारायण आठल्ये यांनी वरील नमुन्याप्रमाणेच स्वखर्चाने बांधून श्रींकडे अर्पण केली. सदरहू दोन्ही दीपमाळांवर कार्तिक शु. १५ च्या दिवशी उभय कुटुंबियांकडून दरसाल त्रिपुर दीपदान करण्यात येत असते.

-: नगारखाना :-

शके १८९३ (इ.स. १९१७) सालात देवस्थानचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी देवालायापुढे उत्सवाकरिता तरी चौघडा चालू ठेवण्यासाठी एक कायमची दगडी इमारत बांधण्यासाठी विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे कै. केशव धोंडदेव भागवत, रा. मुंबई यांनी सुमारे एक हजार रुपये खर्च करून दगडी इमारत नगारखान्याकरिता १० मैलांवरून जांभे दगड आणवून बांधून दिली. या देवावर त्यांची पूर्ण भक्ती होती व त्यांनी निरनिराळ्या प्रकारे पुष्कळच मदत केली. त्या त्यांच्या उदार देणग्यांबद्दल ही सभा सदैव ऋणी राहील.

परंतु हा नगारखाना व दोन्ही दीपमाळा याखालील जमीन अगदी मऊ व तांबळाची असल्याने ही तीनही बांधकामे कमी जास्त प्रमाणात आरली व त्यांची दुरुस्ती करणे जरुरीचे झाले होते. त्यापैकी दीपमाळा दुरुस्तीचे काम शके १८६३ (इ.स. १९४१) साली करण्यात आले. या कामी कै. रावसाहेब काशिनाथ अच्युत उर्फ बाबुराव आठल्ये यांनी २५ रु. व श्री. भा. वा. तथा बंडोपंत जोशी यांनी २० रु. देणगी दिली.

त्यानंतर नगारखाना दुरुस्तीचे काम इ.स. १९५० साली संस्थेने सुमारे १२०० रुपये खर्च करून चांगल्या प्रकारे केले. कै. केशवरावजी भागवत यांनी नगारखान्याची इमारत आपल्या पत्नीच्या नावे देवास अर्पण केली होती. या नगारखान्याच्या जीर्णोद्धाराकरिता संस्थेच्या फंडातून खर्च झालेली ही १२०० रु. ची रक्कम सौ. सीताबाई भ्रतार पुंडलिक आठल्ये; यांनी आपले श्वशुर कै. धोंडो सखाराम आठल्ये, रा. शिपोशी यांच्या स्मरणार्थ इ.स. १९६० साली देऊन, या जीर्णोद्धाराचे श्रेय संपादन केले. इ.स. २००६ साली परत नगारखान्याची दुरुस्ती करण्यात आली त्याचा खर्च रु. ६०००/- कै. धो. स. आठल्ये यांचा नातू रमेश आठल्ये यांनी केले.

उत्सवातून येणारे हरिदास, त्यांचे साथीदार, गायक इत्यादी लोकांचीराहण्याची व्यवस्था देवालयाजवळच संस्थेमार्फत करण्यात यावी असा विचार बरेच दिवस चालू होता. त्यासाठी नगारखान्याची माडी दुरुस्त करून माडीवर जाण्यासाठी जिना बाहेरून लावण्यात आला. तसेच दरवाजे, झडपे वगैरे लावून राहाण्याचे दृष्टीने बंदोबस्त करून घेण्यात आला. हे काम १९८१ च्या सुरुवातीला करून घेण्यात आले.

 

 

-: पार :-

देवस्थानच्या जमिनीत असलेले वड व पिंपळ यांचे जुन्या पारांचे बांधकाम साफ पडून गेले होते. त्यामुळे ते दुरुस्त करणे जरूर होते. यावेळी कै. प्रकाश वैजनाथ आठल्ये, मुंबई यांनी आपले आजोबा कै. ती. वि. वा. आठल्ये यांच्या स्मरणार्थ वड व पिंपळ यांना एकत्रित पार बांधण्याकरिता रु. १८०० ची देणगी दिली व इ.स. १९७४ मध्ये सदर बांधकाम सिमेंट कॉंक्रिटमध्ये पूर्ण करण्यात आले.

तसेच पिंपळाला पार बांधण्याकरिता श्रीमती चंद्रकलाबाई ना. अडूरकर यांनी आपल्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ रु. १०००/- ची देणगी दिली व सदर बांधकामही सिमेंट कॉंक्रिटमध्ये पूर्ण करण्यात आले. या बांधकामासाठी लागणारे

श्री. अडूरकर यांचे मागणीवरून सदर पारावर मे १९८० मध्ये शहबादी फरशी बसवून घेण्यात आली. त्यासाठी संस्थेला एकूण ११६५/- रु. खर्च आला आहे.

-: स्नानगृह :-

श्रीच्या उत्सवाच्या वेळी येणाऱ्या हरिदास व साथीदार यांच्या स्नान वगैरेची व्यवस्था होण्यासाठी विहिरीजवळच धर्मशाळेलगत एक छोटेसे स्नानगृहही बांधण्यात आले आहे.

-: स्टेज :-

उत्सवात होणाऱ्या विशेष कार्यक्रमाच्या वेळी स्टेजची उणीव भासत होती. त्यादृष्टीने पोवळीच्या आत देवालयाच्या ईशान्य कोपऱ्यात २५’ २५’ चे स्टेज १९७४ मध्ये कायमचे बांधण्यात आले व त्यासाठी श्रीहरिहरेश्वरभक्त वे. श्रीपाद वामन आठल्ये, मुंबई यांनी रु. ३००/- ची देणगी वडिलांचे स्मरणार्थ दिली.

वरील सर्व देणगीदारांची संस्था आभारी आहे.

-: शौचकूप :-

हरिदास वगैरे लोकांची देवालायातच राहण्याची सोय करण्याचे दृष्टीने देवस्थानाच्या आवारात शौचाकूपांची नितांत आवश्यकता होती. संस्थेने हे काम पूर्ण करण्याचे ठरवूनही गेली ५/६ वर्षे निरनिराळ्या तांत्रिक अडचणींमुळे ते पूर्ण होऊ शकले नव्हते. डिसेंबर १९८० मध्ये ते पूर्ण झाले. यासाठी संस्थेनेच खर्च करून देवालयाच्या पाठीमागे दोन शौचकूप बांधून घेतले. इ.स. २००६ साली आणखी २ शौचकूप बांधण्यात आले.

-: इतर देणग्य :-

उत्सवमुर्ती : श्रींची रौप्यमयी उत्सवमुर्ती फार दिवस नसल्यामुळे मोठी उणीव भासत होती; परंतु अध्यक्ष कै. वे. शा. सं. श्रीकृष्णशास्त्री आठल्ये यांच्या प्रयत्नांनी उज्जयिनी येथील श्रीमंत भय्यासाहेब शितुत यांनी (इ. स. १९१८ च्या सुमारास) मूर्तीकरिता उदार मनाने शंभर रुपये रोख दिले; व बाकी सुमारे ७५ रु. मंजुरीखर्चाकरिता वगैरे खर्च करण्यात आले. आता उत्सवमुर्ती देखणी व मनोरम झालेली असल्यामुळे श्रींच्या भक्तांना त्याचा फोटो करून ती घरच्या देव्हाऱ्यात ठेऊन त्याची नित्य पूजा करणे शक्य होईल.

 

-: अभिषेक पात्र :-

श्रींच्या उत्सवात रुद्राभिषेक करण्यासाठी रुप्याचे अभिषेकपात्र सुमारे किंमत रु. २५ चे कै. डॉ. वा. न. वाटवे, रा. मुंबई यांनी उत्सवात आल्यावेळी श्रींस अर्पण केले.

-: भांडी :-

श्रीच्या उत्सवाच्या सांगतेवेळी संस्थेकडे भांडी नसल्यामुळे वेळोवेळी फारच त्रास पडत असे. तो दूर करण्यासाठी कै. गंगाराम भास्कर आठल्ये, रा. विजापूर यांनी पुढाकार घेऊन भांडी खरेदी करण्यासाठी वर्गणी जमविण्याची सूचना केली व ती सर्वास मान्य होऊन, त्याकरिता रक्कम जमा करून तीतून नेहमी लागणारी सर्व प्रकारची भांडी खरेदी करण्यात आली. त्यानंतरही काही भक्तांनी त्यात भर घालून श्रींची सेवा केली आहे.

-: मखर :-

सभामंडपात मखराची फार उणीव होती. तरीही ग्रामास्थांपैकी काही मंडळींनी रु. ६० वर्गणीने दूर केली. शके १९६८ साली (इ. स. १९४६) श्री. भालचंद्र वासुदेव जोशी यांनी १४० रु. खर्च करून मखर रंगवून दिले. त्यानंतर ते पुन: वेळोवेळी रंगवावे लागले. इ.स. १९७१ सालीही ते पुन: रंगविण्यात आलेले आहे. मखर प्रेक्षणीय आहे.

सदरहूशिवाय निरनिराळ्या वस्तूंच्याही देणग्या संस्थेकडे जमा झाल्या आहेत. वरील देणग्या देणाऱ्या सर्व मंडळींचे संस्थेतर्फे मन:पूर्वक आभार मानण्यात येत आहेत.

-: नंदादीप :-

श्री संन्निध अहोरात्र नंदादीप चालू ठेवण्याकरता इ.स. १९६२ पर्यंत प्रतिवर्षी पैसे जमवून अव्याहतपणे नंदादीप चालविण्यात येत होता. तो आपले वडील कै. ती. विष्णू वा. आठल्ये यांच्या स्मरणार्थ त्यापुढे श्रीच्या चरणी लावण्यात यावा अशी इच्छा व्यक्त करून, संस्थेचे त्या वेळचे अध्यक्ष कै. वै. वि. आठल्ये यांनी रक्कम रु. १००१/- ची देणगी दिली व तेव्हापासून तो नंदादीप त्या रकमेच्या व्याजातून अव्याहतपणे लावण्यात येत आहे.

-: विहीर :-

देवालायाकरिता देवालयाच्या दक्षिणेकडील पिंपळाखाली एक विहीर पूर्वी बांधलेली होती. परंतु ती दूर असल्यामुळे धर्मशाळेजवळ विहीर बांधल्याने देवदर्शनास जाणाऱ्या भक्तांनी पादप्रक्षालन करून जावे व देवकृत्य करण्यास नजीक व्हावे, अशा दृष्टीने कै. गंगाराम भास्कर आठल्ये, रा. विजापूर यांनी सुमारे १२००/- रु. खर्च करून विहीर बांधून श्रीस अर्पण केली.

सदर विहिरीच्या बांधकामाची उंची इ.स. १९७४ मध्ये वाढविण्यात येऊन ती देवालयाच्या भोवतालच्या पोवळीत घेण्यात आली. त्याकरिता सुमारे रु. ५००/- खर्च आला. सदर बांधकाम श्री. नारायण सखाराम आठल्ये, शिपोशी यांनी स्वत:च्या देखरेखीखाली बिनावेतन करून घेतले.त्याबद्दल संस्था आभारी आहे.

-: दादर शाखा :-

शिपोशी येथील बरीच आठल्ये व इतर मंडळी मुंबईस नोकरीधंद्यानिमित्त आहेत. संस्थेच्या फंडाच्या व्याजातून उत्सवाचा खर्च होतो. पण त्यातून इमारतीच्या दुरुस्तीत पैसा उरत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन तेथील मंडळीना मासिक वर्गणीने १००० रु. जीर्णोद्धार फंड म्हणून जमवून ती रक्कम संस्थेच्या स्वाधीन केली होती. त्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे. दरमहा ही रक्कम सर्वांच्या घरी जाऊन जमविण्याचे कार्य कै. रामचंद्र भास्कर आठल्ये यांनी सातत्याने केले. त्याबद्दल त्यांचे आभारी असणे अगत्याचे आहे. त्यांनी केलेले कार्य सर्वाना अनुकरणीय असेच आहे.

 

-: जीर्णोद्धा :-

श्रींचे देवालय इ.स. १९०० सालच्या सुमारास बांधण्यात आले होते. त्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता, सदर देवालयाचा जीर्णोद्धार इ.स. १९७० सालच्या उत्सावापूर्वी होणे आवश्यक आहे असे दिनांक १.११.१९६८ च्या वार्षिक सभेत ठरविण्यात आले. जीर्णोद्धाराची रुपरेषा आखण्यात आली व त्यासाठी एक कमिटीही नेमण्यात आली. त्या सभेमध्ये चालू परिस्थितीत जीर्णोद्धाराकरिता लागणारी सुमारे रु. ५०,०००/- एवढी मोठी रक्कम कशी जमविता येईल याविषयी विचार विनिमय करता, सर्वानुमते असे ठरविण्यात आले की, शिपोशीकर श्रीहरिहरेश्वर भक्तमंडळापैकी प्रत्येक नोकरी करणाराने आपला एक महिन्याचा महागाई भत्त्यासह संपूर्ण पगार प्रामाणिकपणाने पुढील उत्सावापूर्वी संस्थेकडे आपण होऊन जमा करावा, त्याचप्रमाणे शिपोशीकरांपैकी धंदा उद्योग करणाऱ्या प्रत्येकाने आपला एक महिन्याचा संपूर्ण नफा, संस्थेकडे जमा करावा. परंतु त्यानंतर त्याचप्रमाणे त्याची पूर्तता न होऊ शकल्याने जीर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात होऊ शकली नाही. त्यानंतर डी. २२.११.६९ रोजी, वार्षिक सभेत, जीर्णोद्धाराच्या बाबतीत फक्त देवालयाची घुमटी तेवढीच प्रथम बांधून पुरी करावी असे ठरले. परंतु कबुल केल्याप्रमाणे पैसे जमले नाहीत व त्यामुळे त्याही कार्याला चालना मिळू शकली नाही.

त्यांनतर दि. १७.१.१९७० रोजी, संस्थेची विशेष साधारण सभा भरवून निश्चित रूपरेषा पुन: एकदा आखण्यात येऊन, त्यासाठी एस्टिमेट व प्लॅन तयार करण्यात आले. त्यानंतर निधी जमविण्याचे काम जोरात सुरु झाले. मुंबईकर काही तरुण मंडळींनी त्यासाठी कै. बंडोपंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन नाटके घेतली: परंतु त्यांना अपेक्षेपेक्षा फारच कमी प्राप्ती झाली. इकडे तर जीर्णोद्धाराच्या कामावर कालमर्यादा घातली असल्यामुळे इ.स. १९७० साली होणारा त्रिपुरोत्सव जीर्णोद्धारित देवालायातच झाला पाहिजे, याविषयीची संस्थेचे अध्यक्ष कै. तात्यासाहेब आठल्ये, यांची तळमळ, त्यांचा त्यावेळचा, त्यासंबंधीचा पत्रव्यवहार पाहिल्यावर कोणालाही दिसून येईल. याच सभेत, प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटेल तो आकडा घालो. मात्र त्यानंतर ती देणगी त्याने जीर्णोद्धार कमिटीच्या सेक्रेटरीकडे जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी, आपण होऊन दिली पाहिजे असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे बरीच रक्कम आलीही: परंतु त्यापैकी काही रक्कम अजूनही येणे आहे.

अशा परिस्थितीत, प्रथमत: योग्य कॉंट्रॅक्टर मिळविण्यापासून तो योग्य शास्त्राधार पाहून जनमानसात निर्माण झालेल्या अनेक शंका-कुशंका निरसन करण्याचे फार मोठे अवघड व नाजूक कार्य संस्थेचे त्यावेळचे अध्यक्ष कै. तात्यासाहेब आठल्ये यांनाच करावे कागले. त्यांनी वाईचे तर्कतीर्थ श्री. लक्ष्मण शास्त्री जोशी, धर्मनिर्णय मंडळ, लोणावळा, कै.  लक्ष्मण शास्त्री जेरे, कोल्हापूर व कै. पांडुरंग शास्त्री आठल्ये, राजापूर अशा निरनिराळ्या अधिकारी शास्त्री- पंडितांकडून लेखी शास्त्रार्थ आणून, त्याची माहिती सर्वांना समजावून सांगून, सर्वांचे (हे सर्व शास्त्राधार संस्थेच्या दफ्तरात ठेवण्यात आलेल आहेत.) गैरसमज दूर करून, जीर्णोद्धाराससर्वांचे आनुकूल्य संपादन केले.

त्यानंतर योग्य कॉंट्रॅक्टर मिळविण्यासाठीही कै. तात्यासाहेब यांनाच खूप परिश्रम करावे लागले. त्यासाठी देवरुखचे ख्यातनाम गव्हर्मेंट कॉंट्रॅक्टर श्री. रा. भा. उर्फ बाबुराव आंबेकर यांची खास भेट घेऊन त्यांच्याकडे हे जीर्णोद्धाराचे काम प्रेमविश्वासपूर्वक सुपूर्द करण्यात आले. हे काम त्यांना देवरुखहून शिपोशीला येऊन करावे लागणार असल्यामुळे प्रथमत: ते असे काम घेण्याला विशेष अनुकूल नव्हते. तथापि कै. तात्यासाहेब आठल्ये यांच्या वैयक्तिक भिडेस्तव ते अखेर कबुल झाले. संस्थेतर्फे श्री. दादासाहेब खंडकर, रिटा, डे. इंजिनीअर, देवरुख यांची देखरेखीकरिता नेमणूक करण्यात आली व श्री. जगन्नाथ विष्णू उर्फ बाबासाहेब आठल्ये, रत्नागिरी यांनी त्या उभयतांना प्रत्येक गोष्टीत जरूर ती सर्व मदत देण्याचे आपण होऊन कबूल केले.

त्यानंतर मात्र जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात होऊन ते काम ठरलेल्या मुदतीत उत्तम प्रकारे पुरे झाले. इतके की सर्वांनीच त्यांची मुक्त-कंठाने प्रशंसा केली. त्यानंतर घुमटीबाहेरील श्री गणपती, नांदी, पार्वती, चंड व कीर्तिमुख या परिवार मूर्ती नवीन संगमरवरी आणून, त्यांची स्थापना करावी असे ठरताच, त्यासाठी लागणारा सर्व पैसा कै. तात्यासाहेब आठल्ये यांचे थोरले चिरंजीव श्री अरुणराव यांनी उत्स्फुर्तीने देण्याचे कबूल करून कार्याला जोरदार चालना दिली. त्यानंतर असलेल्या जुन्या मूर्तीचे विसर्जन करणे, जयपूरहून जुन्या बरहुकूम नवीन मूर्ती आणवून, त्या काळजीपूर्वक शिपोशीला पोचत्या करणे व तेथे त्यांची रीतसर अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करणे, इ. गोष्टी पार पाडताना त्यामुळे होणाऱ्या बऱ्या- वाईट सर्व परिणामांची जबाबदारी सर्वांसाठी कै. तात्यासाहेब आठल्ये यांनी स्वत:च एकट्याच्या शिरावर घेऊन, हे महान अवघड कार्य एकदाचे तडीस नेले व तारीख २३-१०-७१ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या कामी कॉंट्रॅक्टर श्री. बाबुराव आंबेकर, श्री. दादासाहेब खंडकर, श्री. जगन्नाथबाबा आठल्ये व इतर सर्व प्रकारे मदत करणाऱ्यांचे आभार मानतो.

त्यानंतर इ.स. १९७१ सालचा जीर्णोद्धारित देवालयातील पहिला त्रिपुरोत्सव व त्यासी लागणारा सर्व जादा खर्च आपण करणार असे कै. तात्यासाहेब यांनी संस्थेकडे कळविले. त्यासाठी त्यांनी सुमारे तीन हजार रुपये खर्च करून इलेक्ट्रिक लाईटची खास व्यवस्था केली व जनमनरंजन व लोकशिक्षण या दोनही दृष्टींनी त्यांनी विशेष कार्यक्रम आयोजिले होते.

                                                                                                                                                                                              

*************************************************************